शरद पवार म्हणाले चिंता करण्याचं काहीच कारण नाही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :-  आज सकाळपासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर ईडीनं टाकलेल्या छाप्यांची चर्चा सुरु आहे. मुंबई आणि नागपूर अशा दोन्ही ठिकाणी ईडीकडून छापे टाकण्यात आले असून या ठिकाणी ईडीनं शोधसत्र सुरू केलं होतं.

या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आण विरोधी पक्षांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या छापेमारीवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

“केंद्रीय यंत्रणांना आलेल्या नैराश्यातून ही कारवाई सुरू असून आम्हाला त्याची यत्किंचितही चिंता वाटत नाही”, असे शरद पवार म्हणाले आहेत. “ईडी वगैरे आम्हाला काही नवीन नाहीत. अनिल देशमुख काही पहिले नाहीत.

अनेकदा सत्तेचा या पद्धतीने वापर करण्याचा पायंडा आत्ताच्या राज्यकर्त्यांनी दाखवला आहे. त्याची आम्हाला यत्किंचितही चिंता वाटत नाही.

अनिल देशमुखांवर केंद्र सरकारच्या काही यंत्रणांनी याआधीही कारवाई केली होती. पण त्यातून त्यांना काय हाती लागलं हे मला माहिती नाही.

माझ्या मते काहीही हाती लागलं नाही. त्या नैराश्यातूनच अजून कुठून त्रास देता येईल का ? या विचारातून हा त्रास देण्याचा हा प्रयत्न आहे. त्याची चिंता करण्याचं आम्हाला काही कारण नाही”, असं शरद पवार म्हणाले आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24