कोल्हापूर : देशात सध्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या (2024 Lok Sabha Election) २ वर्ष आधीच निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून जोरदार मोटबांधणी सुरु झाली आहे.
मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना टक्कर देणारा चेहरा अजूनही विरोधकांना सापडत नाही. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केले आहे.
शरद पवार म्हणाले, पहिल्यांदा प्रत्येक पक्षानं अंतर्गत निर्णय घ्यायला पाहिजे. उदा. काँग्रेस. काँग्रेसमध्ये (Congress) राजस्थानात जरा घडामोडी सुरु झाल्यात. त्याचेही काही निर्णय होतील.
एक दोन बैठका झाल्या. माझ्याच घरात झाल्या. आता त्या गोष्टी हळूहळू ठरतील. पण काही ठिकाणी आमच्यातच मतभेद आहेत. उदा. प. बंगालमध्ये निवडणूक झाली तेव्हा आम्ही ममता काँग्रेस एकत्र होतो.
कम्युनिस्ट वेगळ्या बाजूला होता. पण कम्युनिस्टही एकत्र असते तर चित्र वेगळं असता. उदा. केरळ. केरळमध्ये काँग्रेस वेगळी आहे कम्युनिस्ट, राष्ट्रवादी आणि इतर पक्ष वेगळे आहेत. हे प्रश्न आधी सोडवावे लागतील. याची प्रक्रिया सुरु आहे. हे प्रश्न सुटले की इतरही प्रश्न सुटतील असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही शरद पवार यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, निवडणुकांची प्रक्रिया ज्या ठिकाणी थांबली होती, तेथून पुढील प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
त्यामुळे अनेक ठिकाणी प्रभाग रचनेचा आराखडा तयार व्हायचा राहिला आहे. तो तयार केला जाईल. कुठे त्यावरील हरकती घ्यायच्या बाकी आहेत. त्या आल्यानंतर अंतिम आराखडा तयार होईल. नंतर आरक्षण जाहीर होईल. या सर्व प्रक्रियेसाठी किमान अडीच ते तीन महिने लागतील असेही पवार म्हणाले आहेत.