अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- घराला आग लागली असताना त्याच आगीची पर्वा न करता, आईने आपल्या दोन चिमुकल्यांना सुखरूप बाहेर काढले.
ही घटना राहुरी तालुक्यातील दरडगाव थडी येथील (मायराणी) येथे घडली. येथील आदिवासी कुटुंबातील विजय पांडुरंग गांगड यांच्या राहत्या घराच्या छताला बुधवारी दुपारी आग लागली.
घरात झोपलेल्या दोन मुलांना आईने जीवाची पर्वा न करता त्यांना बाहेर काढल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
मात्र, जीवनावश्यक वस्तूंसह संसारोपयोगी साहित्य आगीत जळून खाक झाले. गांगड हे नदीपात्रात मासे पकडण्यासाठी टाकलेले जाळे ओढण्यासाठी गेले होते.
पत्नी वैशाली घरातील काम आवरून कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या होत्या. त्यांची दोन मुले विष्णू (वय ३) व कृष्णा (वय ८) हे घरात झोपलेले होते.
कपडे धूत असताना घराच्या छतामधून धूर निघत असल्याचे वैशाली यांच्या लक्षात आले. त्या तातडीने घराकडे पळत आल्या.
घरात झापलेल्या मुलांना स्वःतच्या जीवाची पर्वा न करता मोठ्या धाडसाने बाहेर काढले. तोपर्यंत आगीने संपूर्ण घराला वेढले होते.
त्यांनी धाडस करून मुलांना बाहेर काढल्यामुळे दोन्ही मुलाचे प्राण वाचले. परंतु या आगीमध्ये सात गोणी धान्य, तांदूळ, कपडे व संसार उपयोगी वस्तू भांडी आदीसह सर्व साहित्य आगीत जळून खाक झाले.