अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- प्रेमभंग झालेल्या युवतीला लाखो रूपयांना गंडा घालणाऱ्या बंगाली बाबाला नवी मुंबई क्राईम ब्रॅन्चने अटक केली आहे. खारघर येथे राहणाऱ्या २६ वर्षीय युवतीचे फेब्रुवारी महिन्यात प्रेमभंग झाला होता.
प्रियकराने लग्नास नकार दिल्याने ती डिप्रेशनमध्ये गेली होती. या दरम्यान युवतीने लोकल ट्रेनमधून प्रवास करताना बंगाली बाबाची जाहिरात वाचली होती. ‘प्रेमसंबंधातील अडचणींवर उपाय‘ पाहिजे असल्यास संपर्क साधा असा उल्लेख करण्यात आला होता.
युवतीने सदर मोबाईल क्रमांकवर संपर्क साधला असता समोरील इसमाने तो “बाबा कबिर खान बंगाली” असल्याचे सांगितले. युवतीचा प्रियकर पुन्हा लग्नास तयार होण्यासाठी व त्याचे ठरलेले लग्न मोडण्यासाठी त्याने मेरठ येथील दर्ग्यामध्ये काळी जादु करावी लागेल व देवासाठी घुबड, बकरी अशा प्राण्यांचा बळी द्यावा लागेल असं सांगितलं.
यासाठी वेळोवेळी या बंगाली बाबाने युवतीकडून पुजा विधींसाठी पैसे घेतले. ही रक्कम 4,57,000 एवढी होती. मात्र एवढे पैसे देऊन देखील काहीच फरक पडत नसल्याने नैराश्य आल्याने सदर युवतीने बाबा कबिर खान बंगाली यास दिलेले पैसे परत मागीतले व पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी दिली.
त्यावर बाबा बंगालीने तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे गेल्यास काळी जादू करुन अपघात घडवून आणेल व तिला नष्ट करेन असं धमकावलं. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सदर युवतीने खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ठ आणि अघोरी कृत्यांना प्रतिबंध व निर्मुलन व काळा जादु नियम 2013 कलम 3 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.