अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- लग्नानंतर अवघ्या सहा दिवसातच नववधूने सासरच्या लोकांच्या हातावर तुरी दिल्या आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधून परत येते असे सांगून माहेरी गेलेली नववधू परत आलीच नाही.
ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज याठिकाणी घडली आहे. लग्न जुळवणाऱ्या अन्य दोन महिला देखील फरार झाल्या आहेत. त्यामुळे सुखी संसराची स्वप्न रंगवणाऱ्या तरुणाचे लग्नाच्या सहाव्या दिवशीच स्वप्नाचा चुराडा झाला आहे. संबंधित तरुणाचा नेवासा याठिकाणी कापड विक्रीचा व्यवसाय आहे.
काही दिवसांपूर्वी त्याचा विवाह एका २५ वर्षीय तरुणीसोबत झाला पंढरपुरातील दोन महिलांच्या मध्यस्थीने ऑगस्टमध्ये नेवासा येथील एका मंदिरात दोघांचा हिंदू पद्धतीनं विवाह संपन्न झाला होता.
सासरच्या मंडळींकडून नववधूला मंगळसूत्र, कर्णफुले, पायातील पैंजण असं जवळपास ४० ते ५० हजार रुपयांचे दागिने घातले होते. त्याचबरोबर हे लग्न जुळवून देणाऱ्या दोन दलाल महिलांना दोन लाख रुपये देण्यात आले होते. पण सध्या त्या दोघी दलाल महिला देखील फरार आहेत.