अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा संचार तसेच त्याच्याकडून मानवी वस्तीवर हल्ला झाल्याच्या अनेक घटनांना घडल्या नव्हत्या, मात्र पुन्हा एकदा या नरभक्षक प्राण्याने आपली दहशत दाखवायला सुरुवात केली आहे.
नुकतेच बिबट्याने वाघुरीत घुसून मेंढी ठार केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील जांबुत बुद्रुक येथे घडली आहे. याबाबत अधिक सविस्तर माहिती अशी की साकूर येथील लहाणू सावित्रा खेमनर हे मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारण्यासाठी जांबुत बुद्रुक येथे घेवून आले होते.
दिवसभर मेंढ्या चारून झाल्या नंतर संध्याकाळी त्यांनी आपल्या सर्व मेंढ्या वाघुरीत बंद केल्या होत्या. मात्र वाघुरी पासून काही अंतरावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने थेट वाघुरीत घुसून मेंढीवर हल्ला केला.
त्यामुळे मेंढी ठार झाली आहे. रविवारी सकाळी वनसेवक रोहिदास भोईटे, बाळासाहेब डोंगरे यांनी घटनास्थळी जावून त्या मृत मेंढीचा पंचनामा केला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून बिंबट्यांचे हल्ले बंद झाले होते.
मात्र आता पुन्हा हल्ले होवू लागल्याने मेंढपाळांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान परिसरात तातडीने पिंजरा बसविण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.