अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :-गेल्या काही महिन्यांचा आलेख तपासला असता पोलीस विभागातील अनेक कर्मचारी लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये दोषी आढळून आले.
मात्र त्यांच्यावर कारवाई होणार का? हा प्रश्न नेहमीच अनुत्तरित राहतो. यातच काही दिवसांपूर्वी शेवगाव येथील तीन पोलीस कर्मचारी लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. दरम्यान या प्रकरणी शेवगावचे उपअधीक्षक सुदर्शन मुंढे हे देखील चौकशीच्या फेऱ्यांमध्ये अडकले होते.
मात्र या प्रकरणाची कारवाई आता थंडावू लागली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, काही दिवसांपूर्वी शेवगावचे उपअधीक्षक मुंढे यांच्या विशेष पथकातील तीन पोलीस कर्मचार्याविरोधात लाच मागणीचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर ते कर्मचारी पसार झाले आहेत.
त्यांना अटक करण्यात लाचलुचपत विभागाला अजून यश आले नाही. दुसरीकडे उपअधीक्षक मुंढे यांचीही चौकशी लाचलुचपत विभागाने केली. परंतु, कर्मचार्यांना अटक झालेली नसल्याने तपास थंडावला आहे. उपअधीक्षकांच्या चौकशी बाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे.
याप्रकरणातील वसंत फुलमाळी, संदीप चव्हाण, कैलास पवार हे तीन लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर हे पोलीस कर्मचारी पसार झाले आहेत. लाचलुचपत विभागाकडून त्यांचा शोध सुरू आहे.
याप्रकरणी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्या पोलिसांना निलंबीत करत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी लावली आहे.