ताज्या बातम्या

शिंदे सरकारचा ठाकरेंना मोठा दणका, हा निर्णय फिरविला

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra news : मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारताच एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन उध्दव ठाकरे सरकारच्या महत्वपूर्ण निर्णयांवर प्रहार करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.

मुंबईतील मेट्रो कार शेड आरे वसाहतीतच करण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे तसेच महाविकास आघाडीला भाजपने दिलेला हा मोठा दणका मानला जात आहे.

फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजप युतीच्या सरकारमध्ये मेट्रो-३चे कारशेड आरेमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महाविकास आघाडीचे सरकार जेव्हा आले तेव्हा नागरिकांच्या भावना समजून हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बदलला होता.

हे कारशेड आरेऐवजी कांजूरमार्ग येथे करण्याचा निर्णय ठाकरे यांनी दिला होता. मात्र, या जागेच्या मालकीवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील वाद उच्च न्यायालयात गेला आहे.

नवे सरकार येताच बहुचर्चित कुलाबा- वांद्रे-सिप्झ मेट्रो-३चे कारशेड आरे वसाहतीमध्येच करण्यासंबंधी सरकारची भूमिका न्यायालयात मांडण्याचे आदेश राज्याच्या महाधिवक्त्यांना देण्यात आले आहेत.

राज्यात सत्तांतर होताच शिंदे आणि फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मेट्रो-३ चे कारशेड आरेमध्येच करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुढील सुनावणीच्या वेळी न्यायालयात भूमिका मांडण्याची सूचना फडणवीस यांनी महाधिवक्त्यांना दिली. त्यामुळे मेट्रो कारशेडचा गुंता सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Ahmednagarlive24 Office