Sushma Andhare : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना सळो की पळो करून सोडले आहे. शिवसेनेतील आमदारांनी बंडखोरी केल्यापासून सुषमा अंधारे सतत त्यांच्यावर निशाणा साधत आहेत.
सुषमा अंधारे या त्यांच्या बोलण्याच्या शैलीने आणि उघडपणे आव्हाने स्वीकारण्यामुळे अल्पावधीतच प्रकाशझोतात आल्या आहेत. मात्र आता सुषमा अंधारे यांच्यासाठी शिंदे गटाने मोठा डाव आखला आहे.
सुषमा अंधारे यांचे विभक्त झालेले पती वैजनाथ वाघमारे आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे अंधारेंना मोठा झटका मानला जात आहे. तसेच वाघमारे यांना शिंदे गटामध्ये मोठे पद देखील दिले जाणार असल्याची चर्चा रंगात आहे.
वैजनाथ वाघमारे यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे सुषमा अंधारे यांची डोकेदुखी वाढणार का? तसेच सुषमा अंधारे या बॅकफूटवर जाणार का? असे अनेक प्रश्न आता सर्वांना पडायला सुरुवात झाली आहे.
ठाण्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये वैजनाथ वाघमारे आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश होणार आहे.
सुषमा अंधारे या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांना उपनेते पद देखील दिले. सुषमा अंधारे या सतत एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील आमदारांवर तोफ डागत असतात.
सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाला पळताभुई करून सोडले आहे. त्या सतत परखडपणे शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधत असतात. त्यामुळे त्यांना बॅकफूटवर ढकलण्यासाठी शिंदे गटाने मोठी खेळी केली आहे.