अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा 2021’ या अभियानात शिर्डी नगरपंचायतीने नगरपंचायत विभागात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.
शिर्डीकरांनी वृक्षारोपणात दाखवलेली गती आणि स्वच्छता, पर्यावरणस्नेही भुमिकेमुळे हे यश गाठत असल्याची माहिती शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी दिली.
राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. दरम्यान शनिवारी दुपारी या स्पर्धांचा ऑनलाइन पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी आयोजित करण्यात आलेल्या माझी वसुंधरा स्पर्धेत चार गटांत ६८६ ग्रामीण व नागरी संस्थांनी सहभाग घेतला.
नगर पंचायत गटात १३० नगर पंचायती या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. यात शिर्डी नगर पंचायतीने १११३ गुण मिळवून सर्वोत्कृष्ट प्रथम पुरस्कार पटकावला आहे.
नगरपंचायतच्या विभागात शिर्डी नगरपंचायतने महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून साईंच्या नगरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिर्डी नगर पंचायतीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर व मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना ऑनलाइन पद्धतीने हा पुरस्कार प्रदान केला.
शहर स्वच्छता अभियानात सलग दोनवेळा 15 कोटी रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले असून आता तिसरे बक्षीस माझी वसुंधरा अभियानांतर्गत मिळणार आहे. साधारणपणे याही बक्षिसाची रक्कम 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.