अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- निर्बंध शिथील झाल्याने जिल्ह्यात काही नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात तसेच ग्रामीण भागातही गर्दी वाढल्याचे चित्र दिसत आहे. तसेच विनामास्क फिरतानाही काही नागरिक दिसत आहेत.
त्यामुळे करोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संबंधित तालुका प्रशासनाने गावपातळीवर जनता कर्फ्यूचे निर्णय घेतले आहे. यातच आता शिर्डी कर देखील कोरोनाला दोन हात लांब ठेवण्यासाठी पुढे सरसावले आहे.
कोविडचा संभाव्य धोका टाळण्यासाठी शिर्डी नगरपंचायतने शनिवार सकाळी शहरातील व्यापार्यांची बैठक घेऊन अत्यावश्यक सेवा वगळता प्रत्येक मंगळवारी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू तसेच इतर दिवशी दररोज सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शहरातील व्यवसाय सुरू ठेवावे,
असा सर्वानुमते निर्णय नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर व मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. शिर्डी शहरातील व्यवसायिकांनी नियमित वेळेनुसार दुकाने सुरू केली होती. काही ठिकाणी रात्री उशिरा दुकाने बंद केले जात होते.
तर दुकाने किती वाजता खुली करावी आणि बंद कधी करावी याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत शनिवार दि. 12 रोजी दुपारी शिर्डी नगरपंचायतच्या वतीने नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील व्यवसायिकांची नगरपंचायतीच्या सभागृहात बैठक घेण्यात आली.