श्रीरामपूर तालुक्यातील वांगी व एकलहरे येथील बेकायदा वाळू वाहतुकीविरुद्ध महसूलच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर ठेकेदारांकडून जिवे मारण्याची धमकी मिळाल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर यांनी केला आहे. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी; अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देवकर यांनी दिला आहे.
जिल्हाप्रमुख देवकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. त्यात महसूलच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तसेच त्यांनी जीविताला धोका असल्याचे म्हटले आहे.
राज्य सरकारने नदीपात्रात लिलाव करत सर्वसामान्यांना ६०० रुपये ब्रासने वाळू देण्याचे धोरण राबविले. मात्र, अनेकांनी मागणी करूनही घरकुलासाठी वाळू मिळू शकली नाही.
वाहतुकीसाठी दर जादा आकारात काही लाभार्थ्यांना वाळू देण्यात आली. दुसरीकडे, दिवसरात्र उपसा करून वाळूचे डेपो केले गेले. वारंवार तक्रारीनंतरही महसूल विभागाने कोणतीही कारवाई केली नाही.
दुष्काळी स्थितीमध्ये तालुक्यातील वांगी व एकलहरे येथे वाळूचे लिलाव करण्यात आले. मात्र, नदीमध्ये पाणी असताना बोटीने वाळूउपसा करण्यात आला. डेपो तयार करण्याचे काम सुरू आहे.
दिवाळी सुटीचा फायदा घेऊन व महसूलमधील एका अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अन्यत्र डेपो करण्यात आला. स्थानिक ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर तेथे तीन वाहने पकडण्यात आली.
मात्र, प्रत्यक्षात केवळ दोन वाहने तहसीलच्या आवारात लावण्यात आली. महसूलच्या अधिकाऱ्यांकडे संबंधितांविरुद्ध तक्रार केली. मात्र, त्यानंतर जिवे मारण्याची धमकी मिळाल्याचे देवकर यांचे म्हणणे आहे.
तर… तीव्र आंदोलन छेडण्यात येईल
प्रवरेतील बेकायदा वाळू वाहतूक बंद करून महसूलने तेथे पंचनामा करावा. तलाठी व ग्रामसेवकांची तेथे नियुक्ती करावी. सीसीटीव्ही लावण्यात यावे अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देवकर यांनी दिला आहे.