अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- खेडचा विषय हा शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा आहे. पालकमंत्र्यांनी येथील राष्ट्रवादीचे आमदार मोहिते यांचा बंदोबस्त करावा. मोहिते जर त्यांचेही ऐकत नसतील तर हा विषय शिवसेना स्टाईलने हाताळला जाईल.
शिवसेनेने बांगड्या भरलेल्या नाहीत. आम्ही सत्तेसाठी लाचार नाही. सेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला तर शिवसैनिक सर्व बंधने झुगारून देतील, असा सज्जड दम शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिला.
जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांच्या पाडळी (ता. खेड) येथील निवासस्थानी पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. खेड पंचायत समितीतील शिवसेना सभापती भगवान पोखरकर यांच्यावर सोमवारी (दि. ३१) अविश्वास ठराव मंजूर झाला होता.
त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची भूमिका मांडण्यासाठी राऊत यांनी शुक्रवारी (दि. ४) खेडमध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी चौफेर राजकीय टोलेबाजी केली. याप्रसंगी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे,
जिल्हाप्रमुख माऊली कटके, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे व तनुजा घनवट, पंचायत समिती सदस्य अमोल पवार, ज्योती अरगडे व मच्छिंद्र गावडे यांच्यासह प्रकाश वाडेकर, नितीन गोरे, विजया शिंदे, राहुल गोरे, अॅड. विजयसिंह शिंदे पाटील,
ऊर्मिला सांडभोर, पाडळीच्या सरपंच वैशाली काळे आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. खेड तालुक्यातील समस्या शरद पवार यांच्यापुढे मांडण्याचे सूतोवाच संजय राऊत यांनी यावेळी केले. जर मोहिते यांच्या वागण्याची तऱ्हा बदलली नाही तर महाविकास आघाडी राहू अथवा न राहो.
पुढील काळात शिवसेनेचाच आमदार होणार असा थेट प्रहार त्यांनी मोहिते यांच्यावर केला. मतदान प्रक्रियेवर कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती राऊत यांनी दिली. अविश्वास ठरवावेळी शिवसेनेच्या विरोधात मतदान केलेले मच्छिंद्र गावडे यांनी आपली फसवणूक झाल्याचे सांगितले.