अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:-कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी येथील साई मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र काही महिन्यांपूर्वी हे मंदिर पुन्हा एकदा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.
दरम्यान साईंच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढला होता. तसेच कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेची नाळ जोडल्या गेलेल्या साईंच्या द्वारकामाईचे दरवाजे उघडावे, अशी शिर्डी ग्रामस्थांनी वारंवार केली आहे.P
मात्र साईसंस्थानचे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. दरवाजे खुले न केल्यास पंचक्रोशीतील महिलांना एकत्र घेऊन शिवसेना महिला आघाडीच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा महिला शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमिवर संस्थानने साईमंदिरासंह द्वारकामाई दर्शनासाठी बंद ठेवली होती. शासनाच्या आदेशानंतर मंदिर खुले झाले; मात्र गर्दी टाळण्याचे कारण पुढे करत मंदिर प्रशासनाने द्वारकामाईचे मुख्य प्रवेशद्वार अदयाप बंदच ठेवले आहे.
साईबाबांची हयात या द्वारकामाईत गेली. बाबांनी याच द्वारकामाईत धुनी पेटविली. समाधी मंदिराअगोदर शिर्डीकर द्वारकामाईचे दर्शन घेतात. या ठिकाणीच जवळपास सर्व आरती करतात; मात्र लॉकडाऊननंतर द्वारकामाईचे द्वार अदयाप उघडले नाही.
शासनाने सर्व मंदिरे खुली करण्याचे आदेश दिले असताना संस्थान प्रशासन केवळ समाधी मंदिर उघडते; मात्र अन्य मंदिराचे दर्शन बंदच आहे. संस्थान प्रशासनाने सहनशिलतेचा अंत न पाहता द्वारकामाईचे दरवाजे खुले करावे, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महिला शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे .