अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2022 :- शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा धमकी मिळाली आहे. शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून एक धमकीचे पत्र पाठवण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाचे पालकमंत्री पद स्वीकारून एकनाथ शिंदे यांनी मोठे धाडस दाखवले होते. या भागाचा विकास कसा होईल यासाठी एकनाथ शिंदे हे सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
अतिशय दुर्गम असलेला हा भाग नक्षली चळवळीसाठी कुप्रसिद्ध आहे. परंतु या भागाचा विकास करण्याचा ध्यास घेत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासाची अनेक कामे हाती घेतली.
दरम्यान याआधी देखील एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा अशाच स्वरुपाची धमकी त्यांना देण्यात आल्याने तपास यंत्रणा अर्लट झाल्या आहेत.
धमकीबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘आपल्याला याआधी देखील अशा प्रकारच्या धमक्या आल्या असून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.
मला धमकी देणाऱ्यांनी काय करावे हा त्यांचा विषय असून आपण विकासाचे काम असेच सुरु ठेऊ.’ असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात देखील एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी नक्षलवाद्यांनी दिली होती.
मात्र, याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मात्र, आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना धमकी मिळाल्याने राज्याच्या गृह खात्याने एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची देखील सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.