अहमदनगर Live24 टीम, 09 नोव्हेंबर 2021 :- 2022च्या मार्च महिन्यात अहमदनगर जिल्हा परिषद व जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवाजी कर्डिले यांचे पूत्र अक्षय कर्डिले यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
दरम्यान जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले असल्याने राजकीय हालचालींचा वेग वाढला आहे. विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम केव्हाही जाहीर होऊ शकतो.
विधान परिषदेसाठी भाजपकडून ज्येष्ठ नेते माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. त्याच अनुषंगाने आता तयारी सुरु झाल्या आहेत.
शिवाजी कर्डिले हे नगर तालुक्याचे आमदार होते. नगर तालुका मतदार संघाच्या विभाजनानंतर त्यांनी राहुरी मतदार संघातून निवडणूक लढवत दोन वेळा विजय मिळविला होता.
2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पराभवानंतर शांत न बसता त्यांनी जनसंपर्क वाढविण्यास सुरवात केली आहे. नगर, पाथर्डी, राहुरी व श्रीगोंदे अशा चार तालुक्यांत कर्डिले यांचे समर्थक आहेत.
नगर तालुक्यातील प्रत्येक गावात कर्डिले समर्थक आहेत. हीच ताकद अधिक वाढविण्यासाठी अक्षय कर्डिले यांनी नगर तालुक्यात मागील दोन वर्षात प्रयत्न केले आहेत.