ताज्या बातम्या

शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या दुर्देवी घटनेवर विरोधकांचे राजकारण ! विरोधक महाराष्ट्राचा बांगलादेश करू पाहतंय का ?

Published by
Tejas B Shelar

Shivaji Maharaj Statue Collapse : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. स्वराज्याचे संस्थापक शिवराय हे आपल्या सर्वांसाठीच प्रेरणा स्रोत आहेत. मात्र महाराष्ट्रात नुकतीच एक मोठी दुर्दैवी घटना घडलीये. काही दिवसांपूर्वीच छत्रपती शिवरायांचा कोकणातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला पुतळा कोसळला.

दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे स्थित राजकोट किल्ल्यावरील ही घटना संपूर्ण शिवप्रेमींच्या मनाला चटके देणारी होती. यामुळे या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळाले. महाराष्ट्र बाहेरही या घटनेचे पडसाद उमटलेत. संपूर्ण जगभरातील शिवप्रेमींनी या घटनेवरून प्रखड नाराजगी व्यक्त केली.

सरकारने देखील या संवेदनशील घटनेवर आपली दिलगिरी व्यक्त केली. या प्रकरणात जे दोषी होते त्या दोषी लोकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले. यासाठी एका चौकशी समितीची स्थापना सुद्धा करण्यात आली आहे. भारतीय नौदलाने हा पुतळा राजकोट किल्ल्यावर उभारला होता. यामुळे नौदलाने देखील या प्रकरणी खेद व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन दिलगिरी व्यक्त करण्यासोबतच नौदल आणि राज्य शासनाची एक संयुक्त समिती स्थापित केली. एवढेच नव्हे तर राजकोट किल्ल्यावर शिवशिवप्रभूंचा एक नवीन आणि भव्य पुतळा उभारण्याची मोठी घोषणाही केली आहे. शिवरायांचा पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर सरकारला जे करणे अपेक्षित होते ते सरकारने केले आहे.

सोबतच विरोधकांनी या घटनेचा निषेध सुद्धा केला आहे. मात्र काही विरोधी पक्षातील नेते या घटनेला जातीय रंग देऊ पाहत आहेत. या घटनेवरून विरोधकांनी सरकारच्या कारभारावर टीका करण्यासाठी जी पातळी गाठली आहे तशी पातळी महाराष्ट्रातल्या आजवरच्या इतिहासात कोणत्याचं विरोधी पक्षातील नेत्यांनी गाठली नसावी असे मत जनमानसातही उमटू लागले आहे.

शिवरायांच्या नावाने राजकारण

शिवरायांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी राजकोट किल्ल्यावर जाऊन प्रत्यक्ष घडलेल्या घटनेची पाहणी केली. जी की एक खूपच चांगली गोष्ट सुद्धा होती.

मात्र, संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केलीत. यामुळे शिवरायांच्या मावळ्यांच्या भावना भडकल्यात. म्हणून शिवप्रेमींच्या भावना भडकवण्यासाठीच तर हे छायाचित्र सोशल मीडियामध्ये शेअर केली गेली नाहीत ना असा असा सवाल सुद्धा उपस्थित होऊ लागला.

पुतळ्याच्या अनावरणानंतर विरोधी पक्षातील नेते राजकोटवर गेले होते का?

शिवरायांचा पूर्णकृती पुतळा राजकोट किल्ल्यावर उभारला गेला, मग याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केले. मात्र शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणानंतर विरोधी पक्षातील कोणते लोक या शिवतीर्थाच्या दर्शनासाठी गेले होते. पण, जेव्हा शिवरायांचा पुतळा कोसळला तेव्हा विरोधकांनी राजकोट किल्ल्यावर मोठी गर्दी केली. यामुळे शिवरायांच्या आडून विरोधकांकडून राजकारणाचा फड गाजवला जात असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे.

विरोधी पक्षनेत्यांची भूमिका अशोभनीय

महाराष्ट्राच्या राजकारणात आत्तापर्यंत अनेक विरोधी पक्ष नेते झालेत. ज्यांनी सनदशीर आणि कायदेशीर मार्गाने सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडले होते. मात्र सध्याच्या विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका ही खूपच अशोभनीय अन अविश्वसनीय आहे. सर्वच गोष्टीत फक्त राजकारण केले जात आहे. छत्रपती शिवरायांना देखील विरोधी पक्षातील नेत्यांनी राजकारणात खेचले आहे.

महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर शरद पवार, नाना पटोले, आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबई पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत मुद्द्यावर न बोलता थेट सत्ता पक्षातील नेत्यांची जात काढली गेली. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पेशव्यांचे वंशज असे म्हणत त्यांच्यावर जातीवाचक टिप्पणी झाली.

यासाठी काही व्यंगचित्र आणि व्हिडिओज देखील दाखवले गेलेत. म्हणजेच ज्या महाराजांनी कधीच जाती धर्माला थारा दिली नाही त्याच महाराजांच्या महाराष्ट्रात विरोधी पक्षातील नेते जाती-पातीचे राजकारण करू लागले आहेत. सर्वसामान्य जनता देखील विरोधकांची ही भूमिका आता ओळखू लागली आहे.

महाराष्ट्रात मणिपूर होण्याची भीती

नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात मणिपूर होण्याची भीती शरद पवारांनी व्यक्त केली. पण, विरोधी पक्षातील नेते ज्या पद्धतीने महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर जातीपातीचे राजकारण करू लागले आहेत त्यावरून महाराष्ट्रात मणिपूर सारखी परिस्थिती कोण करत आहे ? हा यक्षप्रश्न उभा झाला आहे. दुसरीकडे, जनता जनार्दनाला महाराष्ट्रात जातीय तणाव पसरावा, जाती-जातीत भेदाभेद निर्माण व्हावेत आणि रस्त्यावरचा संघर्ष उद्भवावा अशी परिस्थिती निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे की काय असा प्रश्न पडला आहे.

महाराजांचे मावळे अठरापगड जातीचे

छत्रपती शिवरायांच्या सोबतीला असणारे मावळे अठरा पगड जातीचे, बारा बलुतेदार होते. याचं अठरापगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन छत्रपतींनी स्वराज्याची निर्मिती केली. पण, आज छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातच जाती-जातीचे राजकारण केले जात आहे, अशी भावना शिवप्रेमींकडूनही व्यक्त होऊ लागली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना पूजणारे लोक हे कुण्या एका धर्माचे नाहीत.

जेवढे मराठा समाजातील लोक शिवरायांवर प्रेम करतात, त्यांना पूजतात तेवढेच प्रेम धनगर, माळी, ब्राह्मण अशा विविध समाजातील लोकही करतात. अहो आमच्या राजाला आज सुद्धा अनेक सच्चे मुसलमान शिवप्रेमी आदराने मुजरा घालतात. म्हणूनच जेव्हा महाराजांचा पुतळा कोसळला त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात, मराठी माणसांमध्ये संतापाची लाट उसळली होती.

पण या प्रकरणाला जातीय रंग देण्याचे काम विरोधकांकडून खुलेआम सुरू आहे. यामुळे या घटनेच्या आडून जाती जातींमध्ये तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा आणि महाराष्ट्राचा बांगलादेश करण्याचा विरोधकांचा प्रयत्न तर नाही ना? असा सवाल सर्वसामान्य जनता आता उपस्थित करू लागली आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com