अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांची मोठ्या मताधिक्याने निवड झाल्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व प्राचार्यां च्यावतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बाणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी प्राचार्य बाळासाहेब वाकचौरे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शिक्षक नेते प्राचार्य चंद्रकांत चौगुले, शिवाजीराव केदार, संपत झावरे, गुंजाळ सर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी प्राचार्य चंद्रकांत चौगुले म्हणाले, शिवाजीराव कर्डिले यांनी जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. मातीशी नाळ जुळलेला नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. अभ्यासूपणे सर्वांचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडविले आहे.
शाळा, मुख्याध्यापक, शिक्षकांच्या प्रश्नांबाबत त्यांनी नेहमीच आम्हाला सहकार्य केले. त्यामुळे अनेक प्रश्नही मार्गी लागले आहेत. जिल्हा बँकेत दिलेल्या योगदानामुळेच त्यांची पुन्हा जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाली आहे.
त्यांची यापुढे अशीच घौडदौड सुरु राहील, अशा शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बाळासाहेब वाकचौरे यांनीही नूतन संचालक शिवाजीराव कर्डिले यांना शुभेच्छा देऊन त्यांनी मागील कारकर्दीत जिल्हा बँकेत आपल्या नेतृत्वाने शेतकर्यांचे, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविले असल्याने पुन्हा त्यांची निवड झाली आहे.
सर्वसामान्य, शेतकरी, शिक्षण क्षेत्र अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या कामांनी वेगळा ठसा उमटविला आहे. सर्वांसाठी ते मार्गदर्शक आहेत, असे सांगून शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देतांना शिवाजीराव कर्डिले म्हणाले, मी पदापेक्षा कामांना महत्व देतो.
सर्वसामान्यांचे कामे झाली पाहिजे, त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी आपण काम करतो. जिल्हा बँक ही शेतकर्यांची कामधेनू असल्याने शेतकर्यांची उन्नत्ती व्हावी, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. सर्वांच्या सहकार्याने आपणास हा विजय मिळला असल्याचे सांगून सर्वांचे आभार मानले.