अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-गरिबांच्या जेवणाची सोय म्हणून शिवभोजन थाळी मोफत देण्यास सुरुवात केली आहे.
संचारबंदीच्या नियमांमुळे लोक तिथपर्यंत पोहचू शकतील का, अशी शंका व्यक्त केली जात असतानाच नगरमध्ये मात्र याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून शिवभोजन थाळी गरिबांसाठी वरदान ठरली आहे.
महाविकास आघाडीच्या सरकारने गरीबांना स्वस्तात जेवण उपलब्ध व्हावे, यासाठी दहा रुपयांत थाळी देण्याची ही योजना सुरू केली आहे. मागील लॉकडाउनच्या काळात ती पाच रुपयांना करण्यात आली.
आतापर्यंत ती पाच रुपयांना देण्यात येत होती. मात्र, नव्याने निर्बंध लागू करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजपासून ही थाळी मोफत केली आहे. कडक निर्बंधाच्या काळात कोणी उपाशी राहू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
आज पहिल्याच दिवशी नगर जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर या थाळीला चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात २९ केंद्रांवरून थाळीचे वितरण करण्यात येत आहे. त्यांची क्षमता साडेतीन हजार थाळी प्रतिदिन अशी आहे.
वेगवेगळ्या भागातील केंद्रांना वेगवेगळी क्षमता ठरवून देण्यात आलेली आहे. आज निर्बंधाच्या पहिल्याच दिवशी बहुतांश केंद्रांवरील थाळ्या दुपारी लवकरच संपल्या. त्यामुळे जिल्ह्यासाठी आणखी ८०० थाळ्या वाढवून देण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने पाठविला आहे.