अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- महाविकास आघाडी सरकारची महत्वकांक्षी योजना शिवभोजन थाळीचे जिल्ह्यातील गेल्या काही महिन्यांपासून अनुदान रखडले होते.
मात्र याबाबत मोठा निर्णय झाला असून गेल्या तीन महिन्यांपासून रखडलेले शिवभोजनचालकांचे दीड महिन्यांचे अनुदान येत्या आठ दिवसात अदा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली.
त्याचबरोबर आणखी एक महत्वाची माहिती समोर अली आहे. शिवभोजन केंद्रांना आता शासन पातळीवरून थेट मान्यता देण्यात येत आहे. यामुळे जिल्हा पुरवठा विभागाकडे येणारे आणि निकषात बसणार्या केंद्राचे प्रस्ताव आता थेट राज्य सरकार पातळीवर पाठवण्यात येत आहे.
शिवभोजन केंद्रांना आधी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मंजूरी देण्यात येत होती. त्यानूसार आधी नगर शहरात आणि त्यानंतर मागणीनूसार ग्रामीण भागात हे केंद्र सुरू करण्यात आले.
जिल्ह्यात सध्या 35 शिवथाळी केंद्र सुरू असून त्यापैकी 14 केंद्र नगर शहरात आहेत. प्रत्येक केंद्राला दीडशे, दोनशे थाळीवाटपाचे उद्दिष्ट असून दररोज एकूण 6 हजार 150 थाळ्या वाटप होतात. या थाळ्यापोटी शहरातील केंद्रचालकाला प्रत्येक थाळीमागे 50, तर ग्रामीण भागातील थाळीला 35 रुपये अनुदान मिळते.
परंतु 15 मार्चपासून म्हणजे तीन महिन्यांपासून हे अनुदानच वाटप झालेले नाही. या कालावधीचे सुमारे 2 कोटी रुपये अनुदान रखडले होते. मात्र, नुकतीच सरकारकडून काही प्रमाणात अनुदान आले असून त्यातून मार्च महिन्यांचे अर्धे आणि एप्रिल महिन्यांचे पुर्ण असे दीड महिन्यांचे अनुदान देण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली.