मानाच्या पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी शिवशाही बस सज्ज; सोमवारी पंढरपूरकडे होणार रवाना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या मोजक्याच वैष्णवांच्या उपस्थितीत सोमवार, दि.१९ जुलै रोजी राज्यातील १० मानाच्या पालख्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रस्थान करणार आहेत.

वारकऱ्यांचा पालखी प्रस्थान सोहळा नेत्रदीपक व्हावा यासाठी एसटी महामंडळाच्या ताफ्यातील शिवशाही बस सज्ज झाल्या आहेत.

वारकऱ्यांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी शुभेच्छा दिल्या असून मानाच्या पालख्या पंढरपूरला घेऊन जाण्याचा मान एसटी महामंडळाला मिळाल्याबद्दल श्री. परब यांनी समाधान व्यक्त केले आहे.

आषाढी एकदशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी श्री क्षेत्र पंढरपुरची ओढ लागलेली असते. हरिभक्तीच्या छंदात दंग होऊन, विठूनामाचा जयघोष करीत वारकरी पालख्या घेऊन पायी श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात.

मात्र, वारी सोहळ्यावर यंदाही कोरोनाचे सावट कायम आहे. आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील १० मानाच्या पालख्यांचा सोहळा बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे.

या पालखी सोहळ्यासाठी एसटी महामंडळाने मोफत शिवशाही बस दिल्या आहेत. दि.१९ जुलै रोजी या बसेस पालख्यांसोबत पंढरपूरकडे रवाना होतील. त्यासाठी प्रत्येकी दोन याप्रमाणे १० पालख्यांसाठी २० शिवशाही बसेस सज्ज झाल्या आहेत.

या बसेस विविध आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार आहेत. पालख्यांचा मूळ ठिकाणापासून पंढरपूर येथील वाखरीपर्यंतचा प्रवास शिवशाही बसमधून होणार आहे. त्यानंतर या पालख्या वाखरीपासून पुढे पायी दिंडीने पंढरपूरला जातील.

वारकरी संप्रदायांचा हा प्रवास सुखकर होण्यासाठी शिवशाहीचे चालक योग्य ती खबरदारी घेतील, असा विश्वासही श्री. परब यांनी व्यक्त केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24