अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-करोनावर उपचार घेत असलेल्या एका वृद्धाने सोमवारी सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
पुरुषोत्तम गजभिये असं मृताचं नाव असून ते ८१ वर्षाचे होते. रुग्णांना ऑक्सिजन पुरविणाऱ्या बारीक पाइपने त्यांनी बाथरूममध्ये गळफास घेतल्याची माहिती आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार नागपूर मध्ये घडला आहे.
ट्रामा सेंटरमध्ये कोविड रुग्णांना दाखल करण्याची सुविधा आहे. गेल्या काही दिवसात कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने अनेकांना परत पाठविण्यात येत होते.
जास्तीत जास्त रुग्णांना दाखल करून घेता यावे म्हणून ट्रामा केअर सेंटरच्या बेसमेंटचा उपयोग करून घेण्याचे ठरले व मागच्या आठवड्यात तेथे ९० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले.
याच ठिकाणी गेल्या ४ दिवसांपासून गजभिये यांच्यावर उपचार सुरू होते. रात्रीच्या ड्युटीवर असलेला सफाई कर्मचारी बाथरूम स्वच्छ करण्यासाठी गेला होता. दरवाजावर थाप मारूनही बराच वेळ कुणीही बाहेर येत नसल्यानं त्यानं ही माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिली.
त्यानंतर दरवाजा तोडण्यात आला तेव्हा गजभिये मृतावस्थेत आढळून आले. या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांना येण्याची परवानगी नसल्याने त्यांच्यासोबत कोण होते व त्यांना येथे कोणी दाखल केले याचा शोध पोलीस घेत आहेत.
मेडिकलच्या कागदपत्रात त्यांचा पत्ता रामबाग असा देण्यात आला आहे. रामबाग हा या हॉस्पिटलला लागून असलेलाच भाग आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अजून कळू शकले नाही.
आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय आहे. घटनास्थळावर ‘सुसाइड नोट’ आढळलेली नाही. अजनी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे