धक्कादायक ! चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये 3 लाख घरांचे नुकसान

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- पश्चिम बंगालमध्ये यास चक्रीवादळाचा प्रकोप पाहायला मिळाला. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता पश्चिम बंगाल आणि ओडिसाच्या किनारपट्टी भागातून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

तत्पूर्वी जोरदार वाऱ्यांमुळे उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील नैहाती आणि हलिहारमध्ये अनेक घरांचे नुकसान झाले. तसेच या ‘यास’ चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये किनारपट्टीच्या परिसरात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत.

तसेच, भारताच्या पूर्व किनारपट्टीवर उत्तर ओडिशामध्ये असणाऱ्या धामरा बंदर आणि बालासोरदरम्यान यास चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, जिल्हा दक्षता समित्या आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.

यानंतर ममता बॅनर्जी यांनी यास चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे 1 कोटी जनता प्रभावित झाल्याचे सांगितले. तसेच, 15 लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पश्चिम बंगालमध्ये तीन लाखांपेक्षा जास्त घरांची पडझड झाली आहे.

चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या पूर्व मेदिनीपूर, दक्षिण आणि उत्तर 24 परगणा भागांचा दौऱ्या करणार असल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले. याशिवाय, चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागातील लोकांना दिलासा देण्यासाठी एक कोटींची मदत ममता बॅनर्जी यांनी जाहीर केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24