अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- हल्ली सोशल मीडियाचा भडीमार होऊ लागला आहे. लहानापासून ते थोरापर्यंत सर्वजण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहू लागले आहे.
मात्र याच सोशल मीडियाचा वापर करून पैशाची मागणी करण्याचा एक धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. जिल्ह्यातील एक महत्वाचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्या नावाने फेसबुकचे बनावट खाते उघडून गुगल पे, फोन पे याद्वारे पैशाची मागणी केली जात असल्याचा प्रकार समोेर आला आहे.
याप्रकरणी सिद्धार्थ सुभाष थोरात यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, महसूलमंत्र्यांच्या कन्या डॉ. जयश्री यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीने फेसबुकवर बनावट खाते उघडले.
१ ते २ मार्चच्या कालावधीत रात्री दहा वाजण्याच्या सुमारास या बनावट खात्याद्वारे त्याने काहींना संदेश पाठवून गुगल पे व फोन पे याद्वारे पैशाची मागणी केली. फेसबुक पेजवर मंत्री बाळासाहेब थोरात व कन्या डॉ. जयश्री यांचा फोटो वापरण्यात आला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर सिद्धार्थ थोरात यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.
कोणीतरी खोडसाळपणा करुन बनावट खाते उघडून पैसे उकळण्याचे काम करत आहेत. हे खाते त्वरित बंद करुन तपास करावा. अशी मागणी त्यांनी केली आहे. गुगल पे व फोन पे द्वारे पैसे मागितल्याचे स्क्रिन शाॅट त्यांनी पोलिसांकडे दिले आहेत.