धक्कादायक ! जिल्ह्यात डिझेल तस्करीचे रॅकेट सक्रिय

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :-  देशात वाढत्या इंधन दराने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. यातच पेट्रोल-डिझेलच्या दराने उच्चांक गाठलेला असताना नगर तालुक्यात मात्र खुलेआम रस्त्यावरच डिझेलची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. हे वापरण्यास बंदी असलेले केमिकलयुक्त डिझेल किंवा बायोडिझेल असल्याची चर्चा आहे.

अवघ्या ७८ रुपये प्रतिलिटर दराने हे डिझेल ट्रकचालकांना विकले जात आहे. याबाबत अधिक समजलेली माहिती अशी कि, नगर तालुक्यात ही खुलेआम विक्री सुरू आहे. नगर तालुक्यातील रूईछत्तिसी परिसरात डिझेलचा टँकर रस्त्याच्या कडेला उभा केला जातो.

या टँकरमधून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांमध्ये हे डिझेल भरले जाते. साधारणपणे हा प्रकार नित्यनेमाने सुरू असून, २४ तास विक्री सुरू आहे. स्वस्तात मिळत असल्याने वाहनचालकही येथे रांगा लावून डिझेल भरतात. गुजरात व मुंबई येथून या डिझेलची तस्करी होत असल्याची चर्चा आहे.

या तस्करीमुळे शासनाचा मोठा महसूल बुडत असून, जिल्ह्यात डिझेल तस्करीचे रॅकेट सक्रिय असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. सध्या डिझेलचा भाव ९६ रुपयांवर पोहोचला आहे.

या पंपावरील डिझेलपेक्षा तस्करी केलेले डिझेल कमी दराने विकले जात आहे. तस्करीच्या डिझेलची विक्री ७८ रुपये प्रतिलिटरने केली जात आहे. त्यामुळे एका लिटरमागे जवळपास १८ रुपयांपर्यंत फायदा वाहनचालकांना होतो. प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे.

Ahmednagarlive24 Office