अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30 रा. पिंपळगाव कौडा ता. नगर) आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.
याबाबत गोपीचंद याची आई कमल रोहिदास भोसले (वय 50 रा. पिंपळागाव कौडा) यांनी फिर्याद दिली आहे. गोपीचंद याचा विवाह श्रुती सोबत झाला होता. विवाह झाल्यापासून गोपीचंद व श्रुती यांच्यात वेळोवेळी वाद होत होते.
यामुळे श्रुतीने सासरी न जाण्याचा निर्णय घेतला होता. गोपीचंद हा तिला भेटण्यासाठी सातत्याने भिंगार येथे येत होता. तेथेही दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. त्यानंतर गोपीचंद हा त्याच्या घरी गेला होता.
या त्रासाला कंटाळून शनिवारी रात्री गोपीचंद याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे कमल भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे करीत आहे.