धक्कादायक बातमी ! ‘या’ कारणास्तव चालकाने बसस्थानकातच केले विष प्राशन

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :- बीड जिल्ह्यातील आष्टीमधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. अधिकाऱ्याने बळजबरीने कर्तव्यावर पाठविले आणि वेतनवाढ होत नसल्याचा आरोप करत चक्क एका बस चालकाने बसस्थानकातच विष प्राशन केल्याची घटना कडा येथे घडली.

बाळू कदम असे विष प्राशन केलेल्या चालकाचे नाव असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, गुरूवारी (ता.४) दुपारी २ वाजता आष्टी आगाराचे, आगार प्रमुख संतोष डोके यांनी वाहनचालक बाळू कदम यांना कर्तव्यावर येण्यास सांगितले असता त्यास वाहनचालक कदम यांनी नकार दिला.

परंतु बळजबरीने आगारप्रमुखांनी वाहन चालक बाळू कदम याला सांगितल्याने जामखेड-पुणे ही जादा बस (क्र.एमएच २० बीएल २०८६) घेऊन ते अडीच वाजेच्या दरम्यान पुण्याला निघाले.

बस दुपारी तीन वाजता कडा बसस्थानकावर आल्यानंतर वाहन चालक बाळू कदम याने कडा बसस्थानकावर बस थांबविली व बसस्थानकाच्या बाहेर असलेल्या कृषी दुकानात गेले.

फवारणीचे औषध खरेदी केले. मी आता औषध घेतो असे वाहकाला म्हणत, कडा-आष्टी रोडवरील नदीच्या कडेला हे विषारी औषध प्राशन करण्यासाठी गेले.

यावेळी वाहक साळवे व विभाग नियंत्रक आयशा शेख यांनी पळत जाऊन त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत त्यांनी विष प्राशन केले होते.

त्यानंतर तात्काळ बाळू कदम यांना आष्टी येथील ग्रामिण रूग्णालयात दाखल करण्यात आले. सदरील वाहन चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे आष्टी ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.रामदास मोराळे यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office