अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक बातमी : मारहाणीत माजी सैनिकाचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- हॉटेल समोर चारचाकी लावू नको, असे सांगितल्याच्या रागातून फुंदे टाकळी फाट्यावर आठ ते नऊ लोकांनी केलेल्या मारहाणीत माजी सैनिक विश्वनाथ कारभारी फुंदे (४१) रा. फुंदे टाकळी यांचा मृत्यू झाला.

ही घटना शुक्रवारी फुंदे टाकळी फाट्यावर ही घटना घडली. याप्रकरणी मृताचे भाऊ मच्छिंद्र कारभारी फुंदे यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, मृत विश्वनाथ फुंदे यांचे फुंदे टाकळी फाट्यावर साई प्रेम नावाचे हॉटेल आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजून २० मिनिटा दरम्यान संशयित आरोपी सुधीर संभाजी शिरसाठ याने फुंदे यांच्या हॉटेलसमोर चार चाकी गाडी लावली.

हॉटेलच्या दारात गाडी लावू नका, अशी विनंती फुंदे यांनी केली. यावरुन शिरसाठ याने फुंदे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

व फोन करुन सहकाऱ्यांना बोलावून घेतले. तीन मोटारसायकलवर आलेल्या सात ते आठ अनोळखी लोकांनी व शिरसाट याने लोखंडी पाईप रॉड व लाथाबुक्क्यांनी फुंदे यांना मारहाण केली. सोडवण्यासाठी गेलेला शिरसाट यांचा भाचा अशोक खेडकर यालाही मारले.

शिरसाट व त्याच्या सहकाऱ्यांनी फुंदे यांना गाडीत घालून पाथर्डी येथे आणले. शहरातील श्रीतिलोक विद्यालयाच्या पाठीमागील प्रांगणात पुन्हा बेदम मारहाण केली. पोलिस ठाण्यात तक्रारीसाठी जाऊ नये म्हणून आरोपींनी फुंदे यांना जबरदस्तीने दारू पाजली.

या घटनेत फुंदे गंभीर जखमी झाले. नातेवाईकांनी त्यांना प्रथम पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यानंतर अहमदनगर येथे उपचारासाठी हलवले मात्र त्यांचा मृत्यू झाला.

शनिवारी सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात फुंदे टाकळी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मयताचे भाऊ मच्छिंद्र कारभारी फुंदे यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात सुधीर शिरसाट व अनोळखी सात ते आठ लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रणजित डेरे करत आहेत.

दरम्यान फुंदे टाकळी येथील ग्रामस्थांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात येऊन उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्यासमोर संतप्त भावना व्यक्त करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24