अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- स्त्यात उभे असलेल्या युवकांना हॉर्न वाजवून बाजूला होण्यास सांगितल्याचा राग आल्याने नऊ जणांच्या टोळक्याने राजाभाऊ हिरालाल कोठारी (गुरूजी) व त्यांचे दोन अनुयायी यांना बेदम मारहाण केली.
ही घटना सोमवारी रात्री रामचंद्र खुंट परिसरात घडली. याप्रकरणी नऊ जणांविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्रजेश सतीश गुजराथी (रा. दिल्लीगेट) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
सरवर शेख, जुनेद उर्फ जुन्या, अमन शेख, मुजाहिद बेग, रेहान शेख, फर्मान रफिक शेख (पूर्ण नावे माहिती नाही, सर्व रा. झेंडीगेट), वसीम शेख, शेख भाईजान उर्फ दस किलो, आसिफ शेख सिकंदर उर्फ लूल्या (सर्व रा. मुकुंदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
गुरूजी राजाभाऊ कोठारी व त्यांचे अनुयायी कारमधून जात असताना रोडवर असणार्या युवकांच्या टोळक्याला त्यांनी हॉर्न वाजवून बाजूला होण्यास सांगितले होते. परंतु, आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमून कोठारी महाराज व इतरांना शिवीगाळ केली.
गुरू महाराज कोठारी, प्रशांत अभयचंद सुराणा यांना मारहाण केली. जयंत पारीख यांना जमिनीवर खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
कोतवाली पोलिसांनी याप्रकरणी जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, गैरकायद्याची मंडळी जमवणे, मारहाण करणे, या कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. कोठारी यांना जबर मारहाण झाल्याने रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.