अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत राहणारे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. त्यांचं शव अल्लापूरमधील बांघबरी गद्दी मठाच्या एका खोलित लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे.

प्रयागराज येथील अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांची संशयास्पद मृत्यू झाला आहे. अल्लापूर येथील बाघंबरी या ठिकाणी गळफास लावलेल्या स्थितीत नरेंद्र गिरी आढळले आहेत. आत्महत्या केल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.

त्यांचा मृतदेह पंख्याला लटकलेला अवस्थेत आढळला असून पोलिसांना खोलीचे दरवाजेही चारही बाजूंनी बंद असल्याचे आढळले आहे, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तपास सुरु केला आहे.

या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे. महंत नरेंद्र गिरी आत्महत्या करूच शकत नाही असं त्यांच्या अनुयायांचं म्हणणं असून सीबीआय तपासाची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नरेंद्र गिरी महाराज मागील अनेक दिवसांपासून मानसिक तणावतून जात होते.

निरंजनी आखाड्यातून निष्कासित योगगुरु आनंद गिरी आणि अखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होता. मंदिर-मठ यांच्या जागेवरून वाद शिगेला पोहोचला होता. स्वामी आनंद गिरी यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना पत्र पाठवून वादाची माहिती दिली होती.

कीडगंज येथील गोपाल मंदिर अर्ध विकल्याचा आरोप त्यांनी केला होता. मठ आणि मंदिराच्या विकलेल्या जमिनी विकून झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. नरेंद्र गिरी यांनी आनंद गिरी यांना त्यांच्या आश्रमातून बाहेर काढलं होतं.

हा वाद संपल्यानंतर आनंद गिरी यांनी नरेंद्र गिरी यांची माफी मागितली होती. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. घटनास्थळी स्थानिक पोलीस अधिकारी उपस्थित असून मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलं तैनात करण्यात आली आहेत. यूपी पोलिसांसह फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली असून पुरावे गोळा केले जात आहेत.

दुसरीकडे, सपा नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी महंत नरेंद्र गिरी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.