अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :- कोरोना महामारीचा उद्रेक झाल्यापासून गत वर्षभरात लैंगिक हिंसाचार प्रचंड प्रमाणावर वाढल्याची धक्कादायक माहिती संयुक्त राष्ट्राने (यूएन) मंगळवारी प्रकाशझोतात आणली आहे.
अनेक हिंसाग्रस्त देशांमध्ये लैंगिक छळाला युद्धाची क्रूर युक्ती व राजकीय शोषणाचे हत्यार बनवण्यात आले आहे. त्यामुळे मानवाधिकार व सुरक्षा धोक्यात आली, असा खळबळजनक खुलासा यूएनने पुराव्यानिशी केला आहे.
कोरोना संकट काळातील लैंगिक हिंसाचार उजागर करणारा अहवाल यूएनचे प्रमुख अँटोनिओ गुटेरेस यांनी सार्वजनिक केला आहे.
यात १८ देशांचा संदर्भ देत म्हटले आहे की, जगातील हिंसाग्रस्त क्षेत्रात बलात्कार किंवा लैंगिक शोषणाचा महिलांविरोधात सर्रासपणे वापर करण्यात आला आहे. ७० टक्क्यांहून अधिक काळ्या यादीतील संघटना व सैन्य दलांनी सातत्याने षड्यंत्र रचले आहे.
यात प्रामुख्याने कुख्यात ‘इस्लामिक स्टेट’ अर्थात ‘इसिस’ आणि अल-कायदा व संलग्नित बंडखोर संघटनांचा समावेश आहे. त्यांनी संयुक्तरीत्या लैंगिक हिंसाचार घडवल्याचे अहवालात ठळकपणे नमूद केले आहे.
हिंसाग्रस्त देशांमध्ये राष्ट्रीय लष्कर किंवा पोलिस दलांना शांतता सैनिकांच्या अभियानात सहभागी होऊ दिले नाही; कारण हिंसाचाराला खतपाणी घालण्यात संबंधित देशांचे पोलीस व जवान लिप्त होते.
म्यानमारचे लष्कर व सीमावर्ती गार्डनेसुद्धा महिलांवर जुलमी अत्याचार केला. प्रामुख्याने आफ्रिकन राष्ट्र कांगो, सुदान व दक्षिण सुदान, सीरियाचे सशस्त्र दल व शीघ्र कृती दल लैंगिक शोषणात लिप्त होते.