अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने वाढला आहे. वाढत्या कोरोनाला अटकाव करण्यासाठी प्रशासन देखील युद्धपातळीवर हालचाली करत आहे.
दरदिवशी धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. यातच एक महत्वाची माहिती समोर आली आहे. पारनेर पोलीस ठाण्याच्या कोठडीतील सतरा आरोपींना करोना संसर्ग झाला असल्याचा प्रकार समोर आला आहे.
पारनेर पोलीस ठाण्याच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या पंधरा आरोपींना करोना संसर्ग झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.यापूर्वी दोन आरोपींना करोना संसर्ग झाला आहे.त्यामुळे करोना बाधित आरोपींची संख्या सतरा झाली आहे.
पोटात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीने केल्यानंतर त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. उपचारादरम्यान या आरोपीची कोविड चाचणी करण्यात आली.
या चाचणीतून आरोपीला करोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.तसेच या आरोपीच्या पोटात पाणी झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले.त्यामुळे या आरोपीला पुढील उपचारासाठी ससून (पुणे) रुग्णालयात हलवण्यात आले.
न्यायालयीन कोठडीतील आरोपी करोना बाधित आढळून आल्यानंतर पारनेर पोलीस ठाण्याच्या इतर बराकींमध्ये असलेल्या पोलीस व न्यायालयीन कोठडीत असलेल्या
इतर ४६ आरोपींची कोविड चाचणी करण्यात आली.त्यापैकी १५ आरोपींचे चाचणी अहवाल सकारात्मक आले.
पारनेर पोलीस ठाण्याच्या कोठडीतील आरोपी एकाच वेळी मोठ्या संख्येने करोना बाधित आढळल्याने पारनेर पोलीसांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.