धक्कादायक ! बेपत्ता भाजी विक्रेत्याचा मृतदेह आढळला नदीच्या पात्रात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावानजीक नदीच्या पात्रामध्ये एकाचा मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती स्थानिकांनी दिली. पोलिसांनी चौकशी केली असता तो पढेगाव येथील भाजी विक्रेता शंकर उत्तम गलांडे वय ३१ असल्याची माहिती समजली.

भाजींच्या पिशव्यांसह त्याची दुचाकी परिसरात आढळून आली असून गेल्या ३ दिवसांपासून तो घरी आला नव्हता असे कुटुंबीयांनी सांगितले. त्याने आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,

बेलापूर नजीकच्या प्रवरा नदीच्या पुलावर एक दुचाकी आणि नदीत एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. तेथील लोकांनी याबाबत माहिती पोलिसांना दिली. दुचाकी आणि मृतदेह यांचा काहीतरी संबंध असल्याचा संशय पोलिसांना आल्याने दुचाकीची तपासणी करण्यात आली.

पोलिसांनी तपास सुरू केला. दुचाकीला अडकविलेल्या पिशवीत एक डायरी होती. त्यावर शंकर उत्तम गलांडे असे नाव होते. त्याच नावाच्या व्यक्तीचे ओळखपत्रही होते. याशिवाय काही फोन नंबर लिहिले होते. पोलिसांनी त्यावर संपर्क करून विचारपूस सुरू केली.

त्यातून त्याच्या घरच्या लोकांशी संपर्क झाला. त्यांनी शंकर गलांडे भाजी विक्रेता असून तीन दिवसांपासून घरी आला नसल्याचे सांगितले. तोपर्यंत नदी पात्रातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. नातेवाईंकांनी त्याची ओळख पटविली.

मृतदेह आणि दुचाकी शंकर उत्तम गलांडे यांचीच असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, नदीपात्रात त्यांचा मृत्यू कसा झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, त्यासंबंधी कोणतीही चिठ्ठी तेथे आढळून आलेली नाही.

त्यामुळे आत्महत्या केली असली तरी ती कोणत्या कारणातून झाली, हेही अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतदेह तपासणीसाठी सरकारी रुग्णालयाच पाठविण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24