अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे प्रशासन पुन्हा एकदा अलर्ट झाले आहे. दरदिवशी कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.
यातच अनेक मंत्र्यांना नुकतेच कोरोनाची बाधा झाल्याच्या बातम्या ताज्या असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या कुटुंबातील 12 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
यात आमदार गायकवाड यांची पत्नी, सून, 12 दिवसांची नात, दोन्ही पुतणे, आमदार गायकवाड यांच्या वहिनी, त्यांचे भाचे आणि परिवारातील आणखी काही सदस्य अशा 12 जणांचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
सोबतच आमदार गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयातील टाईप राइटर आणि चालक सुद्धा पॉझिटिव्ह आल्याने 11 मार्चपर्यंत त्यांचे कार्यालय सुद्धा बंद राहणार आहे.
आमदार गायकवाड अधिवेशनासाठी मुंबईत असल्यामुळे ते स्वतः व त्यांच्यासोबतची टीम मात्र निगेटिव्ह आहे. आज 6 मार्चला आमदार गायकवाड घरी येणार असले तरी घरी किंवा कार्यालयावर सध्या कुणी संपर्क करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहा:कार माजवला आहे. गेल्या वर्षी भारतात दाखल झालेला कोरोना व्हायरसचं सावट दिवसागणिक वाढत आहे. काही महिन्यांपूर्वी मंदावलेल्या कोरोना रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचं समोर येत आहे.