अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- आज एकीकडे वीजवितरण कंपनी शेतकऱ्यांना भरमसाठ वीजबिले देवून वसुलीसाठी त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम मोठ्या अभिमानाने करत आहे.
मात्र दुसरीकडे त्याच शेकऱ्यांना अखंडित वीजपुरवठ्यासह वीजवाहिन्या व रोहित्रांची देखभाल करण्याचे भान ठेवत नाही हे विशेष. वीज कंपनीच्या याच गलथानपनामुळे आज एका ज्येष्ठ शेतकऱ्याचा बळी गेला आहे.
नगर तालुक्यातील आठवड या गावातील शेतकरी नानाभाऊ धोंडीबा मोरे वय ७० हे आपल्या कांद्याच्या शेतात पाणी देत असताना विद्युत वाहिनी तुटून अंगावरल पडल्याने नानाभाऊ मोरे यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर तालुक्यातील आढवड येथील शेतकरी नानाभाऊ धोंडीबा मोरे हे आपल्या शेतात कांद्याच्या पिकाला पाणी देत होते.
दुपारी दोन ते अडीच वाजता त्यांच्या शेतातून गेलेली विद्युतवाहीनी अचानकपणे तुटली व ती मोरे यांच्या थेट अंगावरच पडली.ही घटना शेजारील शेतकऱ्याच्या मुलाने पाहिली.
त्याने आरडाओरडा केला व गावकऱ्यांच्या लक्षात ही बाब आणून दिली, त्यानंतर गावकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयास संपर्क करून या भागातील विद्युत पुरवठा बंद करण्यास सांगितला.
वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर गावकऱ्यांनी अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोरे यांना दाखल केले. परंतु येथील डॉक्टरांनी मोरे यांना मृत घोषित केले.