अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर परिसरातील निपाणी वडगाव रेल्वे स्टेशनजवळ संदिप मधुकर पवार यांच्या आठ शेळ्यांवर रात्री २ वाजता बिबट्याने हमला करून त्यांना ठार केले.
आब्बात अधिक माहिती अशी कि, निपाणी वडगाव स्टेशनजवळ पवार कुटुंब मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करते. मुलीच्या लग्नाकरीता या शेळ्यांचे पालन केले होते. घरच्या बाजूला असलेल्या शेडमध्ये या शेळया बांधलेल्या होत्या. शेडला पत्र्याचे दार असून रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास या दाराला तोडून बिबट्याने आत प्रवेश करून आठही शेळ्यांना ठार मारले.
त्यामुळे या परिसरात अत्यंत दहशतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेमुळे या कुटुंबाचे सुमारे एक लाखाचे नुकसान झाले. भरवस्तीत या बिबटयाचा वावर असून या वस्तीत लहान मुले, जनावरे मोठ्या प्रमाणात आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी या परिसरात पिंजरा लावण्याची मागणीदेखील अनेक नागरीकांनी या पर्वी केली आहे.