अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- संगमनेर तालुक्यातील चिखली येथे जन्मदात्या बापाचा सांभाळ कुणी करायचा या कारणावरुन दोघा मुलांमध्ये वाद झाला.
या वादातूनच या दोघा मुलांनी बापाचा गळा दाबून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत दशरथ माळी यांचा खून झाला आहे.
याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल बन्सी येशू टोपले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यातील चिंचोलीगुरव येथील रहिवाशी असलेले दशरथ सुखदेव माळी यांचे कुटुंब हे चिखली येथील विटभट्टीवर कामाला आहे.
शनिवार रात्रीच्या सुमारास दशरथ सुखदेव माळी व त्यांची मुले रामदास दशरथ माळी व अमोल दशरथ माळी हे घरीच होते. जन्मदात्या बापाचा सांभाळ कुणी करायचा यावरुन रामदास व अमोल या दोघांमध्ये वाद झाला.
या वादातूनच दोघांनी मिळून मध्यरात्रीच्या सुमारास बाप दशरथ सुखदेव माळी यांचा गळा आवळून खून केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात संशयीत आरोपी रामदास माळी व अमोल माळी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे