file photo

अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आह़े शेवगावनंतर आता पारनेर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शेतीसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

पारनेर तालुक्यातील ढवळपुरी ते वनकुटे व वनकुटे ते पळशी या गावा दरम्यानच्या काळू नदीवरील दोन पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने या भागाचा संपर्क तुटला आहे. पारनेर तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे ढवळपुरी वनकुटे पळशी परीसरातील नदी नाल्यांना पूर आला आहे. पाणी शेतीत घुसल्याने पिकांचे घरांचे तसेच रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

या पावसाने ढवळपुरी, वनकुटे, पळशी या परिसरातील ओढे, नाले दुधडी भरून वाहत होती. परिणामी येथील काळू नदीला पूर आला होता. पुराचे पाणी किनार्‍यावरील शेतात घुसले तसेच पावसाचेही पाणी शेतांमधील सखल भागात साचून राहिल्याने बाजरीसह कांदा व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

संततधार पावसामुळे जिर्ण झालेल्या अनेक घरांची पडझड झाली असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.पाळीव प्राण्यांनाही या अतिवृष्टीचा फटका बसला असून शेतामधील शेतमालाचेही मोठे नुकसान झाल्याचे आहे. मान्सूनला प्रारंभ झाल्यानंतर या परिसरासह तालुक्यात पावसाने हजेरी न लावल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण होते.

गेल्या काही दिवसांत पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असले तरी अशा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीने शेतकरी वर्गापुढे पुन्हा संकट उभे राहिले आहे.