अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- कोरोनाने राज्यासह जिल्ह्याला घट्ट विळखा घातला आहे. अनेक कठोर निर्बंध करून देखील कोरोनाची आकडेवारी कमी करण्यात प्रशासनाला यश येत नसल्याचे दिसून येत आहे.
यातच रुग्णांना आरोग्य सुविधा पुरविण्यात देखील प्रशासन अपयशी ठरते आहे. यामुळे दरदिवशी अनेक रुग्णांचे बळी जात आहे. नुकतेच श्रीगोंदा येथील ग्रामीण रूग्णालयात ऑक्सिजन अभावी दोघांचा मृत्यू झाला.
या दोघांसह तालुक्यातील खासगी व शासकीय कोविड सेंटरमध्ये मिळून अकरा जणांचा कोरोनाने बुधवारी मृत्यू झाला. दरम्यान ग्रामीण रूग्णालयात २९ जणांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी सकाळी अकरा वाजता ग्रामीण रूग्णालयात ऑक्सिजन पुरवठा विस्कळीत झाला.
ऑक्सिजन नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांची धांदल उडाली. ऑक्सिजन बेडवर असलेल्या रूग्णांचेही हाल होऊ लागले. यातच रूग्णाचा मृत्यू झाला. याशिवाय दिवसभरात शासकीय व खासगी कोविड सेंटरमध्ये मिळून अकरा जणांचा मृत्यू झाला.
श्रीगोंदा येथील स्मशानभूमीत नऊ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तालुक्यात दहा दिवसात २९ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.