Maharashtra news : पुण्यातील लाल महालात एका लावणीचं शुटिंग झाल्याचे समोर आले आहे. यावर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला असून संभाजी ब्रिगेडने संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
ज्या लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या शायस्तेखानाची बोटं तोडली, ज्या लाल महालात राहून शिवाजी महाराजांनी कोंढणा जिंकण्याचं स्वप्न पाहिलं, त्याच लाल महालात लावणीचं शुटिंग होणे अशोभनीय असल्याची टीका करण्यात येत आहे.
इंस्टाग्रामवर रिल्स शेअर करण्यासाठी ही लावणी करण्यात आली आहे कुलदीप बापट यांनी या संबंधित गाण्याचं शूटिंग केलंय तर डान्सर वैष्णवी पाटील यांनी लावणी केल्याचं समोर आले आहे. सोशलय मीडियात यासंबंधी व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्या चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा या गाण्यावर एक तरुणी थिरकताना दिसत आहे. महालातील मध्यवर्ती ठिकाणी ही तरुणी अदाकारी करत असल्याचं व्हिडिओमधून दिसत आहे.
लाल महालात महापालिकेचे सुरक्षा रक्षकही तैनात असतात. तरीही हा प्रकार झाल्याने संबंधितांवर कडक करवाई करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी केली आहे.