अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- कोरोनाचे प्रमाणपत्र बंधनकारक केल्याने छोटे मोठे व्यापारी, दुकानातील कामगार व भाजी-फळे विक्रेत्यांनी कोरोना चाचणी करून घेण्यासाठी राहात्यात मोठी गर्दी केली आहे. गेल्या दोन दिवसांत ८१८ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली.
त्यामध्ये फक्त एक व्यक्ती बाधित आढळला. कोरोना चाचणी प्रमाणपत्राअभावी प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जायला नको, म्हणून कोरोना चाचणी करण्याकरीता आरोग्य पथकाकडे दुकानदार, विक्रेते एकच गर्दी करत आहेत.
त्या करीता सकाळीच लांबवर रांगा लागल्या. राहाता शहरात रविवारी १३७ आरटीपीसीआर तर २५० रॅपीड चाचण्या तर सोमवारी १८० आरटीपीसीआर तर २५१ रॅपीड टेस्ट अशा मिळून दोन दिवसांत एकूण ८१८ व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या.
सोमवारी अनलॉकनंतर सर्व अस्थपणांना रॅपीड ॲन्टीजेन व आरटीपीसीआर चाचणी करून त्याचे सर्टीफिकेट दुकानात लावणे अथवा जवळ बाळगणे अत्यावश्यक असल्याचे मुख्य अधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी सांगितले.
त्यानंतर नगरपरीषद हद्दीतील सर्व भाजी विक्रेते, किराणा दुकानदार, दुध विक्रेते, जनरल्स स्टोअर्स, चहाचे दुकान, पान स्टॉल, कृषी सेवा केंद्र, मोबाईल शॉपी, हॉटेल, मॉल, कापड दुकान,
अंडी, मटन, चिकन दुकानदार, चप्पल दुकानदार इत्यादी सर्व छोट्या दुकानदारांनी त्यांची व कामगारांची तपासणी करण्यासाठी नगरपरीषदेच्या फिरत्या पथकाकडे एकच गर्दी केली.
चाचणीसाठी मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधीक्षक नवनाथ जगताप, नोडल अधिकारी अशोक साठे, अनिल कुंभकर्ण, सुनिल मोकळ आदी नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी विशेष मेहनत घेत आहेत.