अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-नगर तालुक्यातील जेऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीचा तुटवडा जाणवत असुन, तात्काळ लसीचा पुरवठा करण्याची मागणी माजी उपसरपंच बंडू पवार यांनी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत १६ गावे येत असून सुमारे ५० हजारच्या वर लोकसंख्या आहे. त्यामध्ये सर्वात जास्त सुमारे १५ हजार लोकसंख्या जेऊर गावची आहे. त्यामुळे जेऊरसाठी लसीचा पुरवठा जास्त प्रमाणात होणे गरजेचे आहे.
आरोग्य केंद्रांतर्गत छोट्या छोट्या गावांनी लसीकरणाचे कॅम्प घेण्यात येत आहेत, ही बाब चांगली असली तरी जेऊर गावाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जेऊर आरोग्य केंद्रात दररोज सकाळी वाड्या वस्त्यांवरुन लोक लसीकरणासाठी येत आहेत.
परंतु लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना विनाकारण हेलपाटे मारावे लागत आहेत. तरी लसीचे वितरण लोकसंख्येनुसार करण्यात यावे. लसीकरणासाठी नागरीकांची हेळसांड होत असुन अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप बंडु पवार यांनी केला आहे.
येथिल आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचे काम चांगले असुन लस उपलब्ध होत नसल्याने त्यांचा नाईलाज होत आहे.जेऊर येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीचे नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने जुनी इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे.
त्यामुळे आरोग्य कर्मचारी तसेच कोरोना तपासणीसाठी येणारे रुग्ण व लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना ताटकळत उन्हामध्ये उभे राहावे लागत आहे. लसीकरणासाठी येणारे नागरिक व कोरोना तपासणी करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या जास्त असून जागेअभावी सर्व एकत्र बसताना दिसतात.
त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तरी लसीकरण व तपासणी याबाबत योग्य नियोजन करून नागरिकांची हेळसांड होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी पवार यांनी केली आहे.