अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने लसीकरण मोहीम जिल्हापातळीवर तसेच ग्रामीण पातळीवर मोठ्या प्रमाणावर राबवा असे आदेश दिले आहे.
मात्र आता नागरिकांचा लसीकरण मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळतो आहे तर जिल्ह्यात लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक नागरिक केंद्रावर लसीकरणासाठी येत होते. मात्र, लस उपलब्ध नसल्याचे कारण त्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांकडून देण्यात येत होते.
त्यामुळे अनेक नागरिकांचा हिरमोड झाला. जेवढे काही डोस ग्रामीण भागात शिल्लक होते, ते शुक्रवारी वाटप करण्यात आले. नगर शहरातील लसीकरण केंद्रांवर शुक्रवारी लस नव्हती. त्यामुळे ही केंद्र बंद होती.
नगर जिल्ह्यासाठी लागणारी कोरोना प्रतिबंधक लस पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट (कोविशिल्ड) तसेच भारत बायोटेककडून (कोव्हॅक्सिन) येते. आतापर्यंत ३ लाख ३४ हजार ४०० डोस कोविशिल्ड,
तर ७३ हजार ९८० डोस कोव्हॅक्सिनचे नगर जिल्ह्यासाठी प्राप्त झाले आहेत. २० एप्रिलला अखेरचे २२ हजार ३१० डोस प्राप्त झाले होते. ते डोस त्यादिवशी लसीकरण केंद्रांना वाटप करण्यात आले. त्यानंतर मात्र अद्यापपर्यंत लसीचा पुरवठा झालेला नाही.
त्यामुळे ग्रामीणसह नगर शहरातील बरीचशी केंद्र शुक्रवारी बंद होती. दरम्यान, लसीकरणासाठी आता नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे; परंतु मागणीएवढा लसींचा पुरवठा होत नसल्याने अनेक ठिकाणी अडचण येत आहे.
आरोग्य विभागही लसीकरणासाठी मोठा पुढाकार घेत आहे; परंतु लस उपलब्ध होत नसल्याने त्यांचाही नाइलाज होत आहे.