अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- राज्य सरकारकडून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी महापालिकेला १ मे रोजी १० हजार डोस वितरीत केले आहेत. महापालिकेच्या सहा आरोग्य केंद्रांमध्ये ही लस दिली जात आहे.
परंतु, ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांना देण्यासाठी महापालिकेकडे लस शिल्लक नाही. लसीचा तुटवडा असल्याने महापालिकेने ४५ ते ६० या वयोगटातील नागरिकांना पहिला डोस देणे बंद केले असून, या वयोगटातील नागरिकांना फक्त दुसरा डोस दिला जात आहे.
त्यामुळे नागरिकांचाही गोंधळ उडाला असून, लस घेण्यासाठी नागरिक केंद्राबाहेर रांगा लावत आहेत. परंतु, लस शिल्लक नसल्याने पहिला व दुसरा डोस घेणाऱ्यांना लस दिली जात नाही.
केंद्र सरकारकडून लस प्राप्त झाल्यानंतर ४५ वर्षांपुढील नागरिकांना पहिला व दुसरा डोस दिला जाईल. त्यामुळे या वयोगटातील नागरिकांना लस येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.