अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- देशभरात सर्वसामान्य नागरिकांचंही कोरोना लसीकरण सुरू झालं आहे. 60 पेक्षा जास्त वयाचे म्हणजे ज्येष्ठ नागरिक ज्यांना ही लस दिली जाते आहे.पण लोकांच्या मनात या लशीविषयी काही शंकाही आहेत. कोरोनाच्या लशीबद्दल भारतातही काही गैरसमज आणि मिथकं पसरली आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. पहिल्या टप्प्यात प्राधान्याने आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी आदींना लस देण्यात आली. आता दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षांवरील व्यक्ती तसेच अन्य आजार असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे दीड कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. देशभरातील काही नागरिकांना सुरुवातीच्या टप्प्यात कोरोना लसीचे दोन डोस दिले जाणार आहेत.
मात्र, अन्य देशवासीयांना लस दिली गेली नसल्यामुळे मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. भारतात कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, पोलीस आणि अन्य कोरोना योद्ध्यांना प्राधान्य दिले जात आहे. कोरोना आणि लसीकरणाच्या अनुषंगाने अशी परिस्थिती असताना लसीबाबत अजूनही नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत.
आरोग्य मंत्रालयाने नागरिकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. नेमके नागरिकांच्या मनात कोणते प्रश्न आहेत आणि त्याची उत्तर काय आहेत, हे जाणून घेऊया… आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, तज्ज्ञांच्या मते लसीकरणानंतर मद्यपान केल्याने आरोग्यावर काही विपरित परिणाम होतो, असे दर्शवणारे पुरावे अद्याप तरी मिळालेले नाहीत. याचा अर्थ मद्यपान केल्याने दुष्परिणाम झाल्याचं दिसून आलेलं नाही.
लसीचे दोन्ही डोस हे सुरक्षित आहेत, असं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. परंतु, लस घेतल्यानंतर काही दुष्परिणाम दिसू लागल्यास संबंधित रुग्णाने नजीकच्या आरोग्य सुविधा केंद्राशी संपर्क साधावा. तसेच अशा स्थितीत आरोग्य कर्मचाऱ्यांशी देखील फोनद्वारे संपर्क साधू शकता.
संपर्कसाठीचे फोन क्रमांक लसीकरणानंतर कॉइन एसएमएसमध्ये दिलेले आहेत. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोना लस टोचून घेतल्यानंतरही आपल्याला मास्क घालण्यासह सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. यासाठी शास्त्रज्ञांकडून अनेक कारणे सांगण्यात आली आहेत.
लस दिल्यानंतर कोरोना संसर्गापासून सुरक्षित झाल्याची खात्री दिली जाऊ शकत नाही. लसीकरणानंतर कोरोना संसर्ग नियंत्रणात येणार की नाही, याबाबतही अद्याप स्पष्टता नाही. जागतिक आरोग्य संघटनेकडूनही याबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.