अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. सी. देशपांडे यांनी कारणे दाखवा नोटीस काढली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याने हि कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान याबाबतची माहिती अॅड. सुरेश लगड यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, अहमदनगर महापालिकेचा ठेकेदार सुरज शेळके याने केडगाव येथील निर्मला येणारे यांना नळ जोडणी कनेक्शनवरून धमकी दिली होती.
याप्रकरणी येणारे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी आरोपीविरोधात जुजबी कलम लावले होते, म्हणून तक्रारदार येणारे यांनी अॅड. लगड यांच्या मार्फत न्यायालयात दाद मागितली.
न्यायालयाने कोतवाली पोलिसांना आदेश करत तपास करून एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु, सदर आदेश होऊन चार ते पाच महिने झाले तरी पोलिसांनी सदर गुन्ह्याचा अहवाल न्यायालयात सादर केला नाही व न्यायालय आदेशाचे पालन केले नाही.
म्हणून न्यायालयाने कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक मानगावकर यांना कारणे दाखवा नोटीस काढली आहे. फिर्यादीच्यावतीने अॅड. लगड यांनी न्यायालयात बाजू मांडली.