भयभीत झाले आहेत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :-  जे भयभीत झाले आहेत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा. ते आरएसएसचे लोक आहेत, ते गेलेच पाहिजेत, असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. पक्षातील समाजमाध्यम कार्यकर्त्यांना संबोधित् करताना गांधी बोलत होते.

ते म्हणाले, जे भयभीत झाले ते पक्ष सोडून गेले. भाजप आणि वास्तवाचा मुकाबला करण्याचे ज्यांना भय वाटते ते पक्ष सोडून जाऊ शकतात, तर काँग्रेस पक्षाबाहेरील निर्भय नेत्यांना पक्षामध्ये आणले पाहिजे, असेही गांधी म्हणाले.

नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर राज्यात मोठी संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याची चर्चा असतानाच शुक्रवारी सिद्धू यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

या वेळी राहुल गांधी आणि पंजाबचे प्रभारी हरीश रावत उपस्थित होते. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार असून पंजाब काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

सोनिया गांधी यांनी याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही, निर्णय घेतल्यानंतर त्याबाबतची माहिती दिली जाईल, असे रावत म्हणाले. नवज्योतसिंग सिद्धू यांची पंजाबचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे का, असे विचारले असता रावत यांनी, तसे कोण म्हणाले, असा प्रतिसवाल केला.

पंजाबबाबतचा अहवाल सोनियांना सादर करण्यासाठी आपण येथे आलो होतो, निर्णय घेतल्यानंतर त्याबाबतची माहिती दिली जाईल, असेही रावत म्हणाले. त्यापूर्वी सिद्धू सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून माध्यमांच्या प्रतिनिधींशी न बोलताच निघून गेले.

सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष करण्यास पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांचा विरोध आहे. मात्र रावत यांनी त्याचा इन्कार केला आहे. अमरिंदरसिंग आणि सिद्धू हे पक्षासाठी एकत्रित काम करतील असा तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले.

अहमदनगर लाईव्ह 24