अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- श्रीगोंदे पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये नाकेबंदी, पेट्रोलिंग करत विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्या तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या तब्बल ३ हजार ९१४ व्यक्तींवर गुन्हे दाखल करत १६ लाख ६५ हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती श्रीगोंद्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी लॉकडाऊन काळात विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करून प्रत्येकी ५०० रुपये दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.
कोविडचा प्रसार वाढू नये म्हणून १९ फेब्रुवारी ते ८ जून २०२१ या चार महिन्यांत श्रीगोंदे पोलिसांनी नाकेबंदी, पेट्रोलिंग करून कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांविरुद्ध ३ हजार ९१४ केसेस दाखल करून १६ लाख ६५ हजार १०० रुपये दंड वसूल केला.
अहमदनगर ते दौंड रोडवर काष्टी येथे अंतरजिल्हा चेकपोस्ट लावून वाहने चेक करून विनापरवाना इतर जिल्ह्यातून येणारे, वाहनचालक, वाहनामध्ये ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
श्रीगोंदे शहरात सकाळी ८ पासून रात्री १० पर्यंत पेट्रोलिंग करिता अधिकारी व अंमलदार नेमून कोरोनाचे अनुषंगाने नियमितपणे कारवाई चालू आहे.
ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, लसीकरण केंद्र या ठिकाणी नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त लावण्यात येतो.