अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- भाजपच्या हातात सत्ता गेल्यानंतर देशात जातीयद्वेषाचं विष वाढत आहे. शेतकरी आंदोलन करत आहेत, पंतप्रधानांकडे परदेशात जायला वेळ आहे,
पश्चिम बंगालला जाण्यासाठी वेळ आहे मात्र 20 किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या शेतकऱ्यांची भेट घ्यायला त्यांच्याकडे वेळ नसल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोलकातामध्ये महासभा पार पडली. या महासभेच्या माध्यमातून भाजपनं बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.
मोदींच्या या सभेवर आता विरोधकांची टीका होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींवर टीका केली आहे.ते रांचीमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत बोलत होते.
कृषी सुधारणा कायद्याच्या विरोधात राजधानी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या सुरु असलेल्या आंदोलनाला शनिवारी 100 दिवस झाले. या आंदोलकांची पंतप्रधान मोदी यांनी अजून एकदाही भेट घेतलेली नाही. त्यामुळे विरोधी पक्षांकडून सरकारवर टीका होत आहे.