अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- लोहगाव (ता.नेवासे) येथे बालविवाह प्रतिबंध कायद्याचा भंग करीत एका अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याप्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात सहा जणावर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत समजलेली माहिती अशी की 03 जुलै 2021 रोजी घोडेगाव येथील श्रीनाथ मंगल कार्यालय येथे 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह रामनाथ अशोक शिंदे याच्याशी लावून दिला होता.
ही बाब नगरच्या बालकल्याण समिती व चाइल्ड लाईन सेवाभावी संस्थेस समजली. शनिवारी (ता. २७) रोजी सायंकाळी प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली.
तक्रारीत तथ्य आढळल्याने रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या विवाह प्रकरणी घोडेगाव (ता.नेवासे) येथील ग्रामसेवक अर्जुन गाडगे यांच्या फिर्यादीवरुन अल्पवयीन मुलीचे वडील आप्पासाहेब ढेरे,
आई संपदा ढेरे, सासरा अशोक शिंदे, सासू झुंबरबाई शिंदे, नवरा रामनाथ शिंदे व पुरोहित (नाव माहित नाही) या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार एम. आर. आडकित्ते करत आहेत.